Pages

Saturday, September 25, 2010

असे घडले अयोध्याकांड..................

बाबरी मशीद चा मुद्दा सध्या गरम आहे....
या बाबत महाराष्ट्र टाईम्स मधे छान लेख आलाय...
तो जसाच्या तसा पोस्ट करतोय....


६ डिसेंबर १९९२
राम रस्त्यावर सकाळी ८.३० पासून लागलेल्या रांगा प्रथम आंध्र, नंतर महाराष्ट्र वगैरे वगैरे परिसरात सुमारे दीड-दोन लाख कारसेवक बसलेले. राम कथा कुंजा च्या गच्चीवरून ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना चाललेल्या असतात. शांततेनं कारसेवा करा, अनुशासन पाळा, काही लोकं माथी भडकावतील, पण शांतता राखा...
अशोक सिंघल बोलण्यास उभे राहतात. आम्ही सर्व हिंदू एक आहोत. आमच्यात मतभेद नाहीत. ही पत्रकार मंडळी खोटंनाटट लिहितात. त्यांना योग्य तो जबाब द्या 'या आखात बीबीसीचा उद्धार.

वादग्रस्त २.७७ एकर जागेत, शिलान्यास झालेल्या ठिकाणी झेंडा फडकावलेला असतो. राज्याचे पोलिस चहुबाजुंनी तैनात. त्यांच्यापुढे संघाचे स्वयंसेवक, क्षणाक्षणाला उत्साहाचे उधाण येत असते. 
सियावर रामचंद्र की जय वगैरे. सकाळी ठीक ९.५५ वा. साधू-संतांना राम चबुत-यावर सोडण्यात येते. शंखध्वनी सा-या आसमंतात घुमतो.

याच वेळी सशस्त्र पोलिसांसह जिल्हा दंडाधिकारी श्रीवास्तव पाहणीसाठी चबुत-यावर येतात. रामनामाच्या घोषणा. आजूबाजूया सर्व इमारती-झाडांवर बघे कारसेवक. चबुत-यावर ३००-४०० साधू जमतात.. साधू संत आज चबुतरा धुणार होते. पण त्यासाठी आधी ठरल्याप्रमाणे शरयू नदीतून पाणीही आणलेले दिसत नव्हते. 
'राममंदिर के नींव पर शिलान्यास) मही डालनी है ', असं सांगून आजच्या कारसेवेत सर्वांचं समाधान होईल हे आम्ही पाहू. पण तुम्ही संयम राखा... १०.२० वाजता लालकृष्ण अडवाणी राम चबुत-यावर येतात. बरोबर मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन. कारसेवकांमार्फत प्रचंड स्वागत. दोघं नेते पाहणी करतात. एवढ्यात जोशींना ठेच लागते. अंगठ्याचे नख निघते. तसे ते बाहेर निघतात.

एवढ्यात दक्षिणेच्या दरवाजातून काही कारसेवक कडे तोडून आत घुसतात. आगंतुकपणे. घोषणांचा धुमाकुळ. संघ स्वयंसेवक त्यांना अडवतात. थोडी हाणामारी. थोड्या वेळाने आणखी काही तसेच घुसतात. अडवाणी त्यांनी शांत करण्याऐवजी तसेच निघून जातात. घुसखोरांचा पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्यापुढे नाच सुरू होतो. साधूसंत दोन्हीकडून नाच पाहतात.
राम कथा कुंज च्या गच्चीवरून अडवाणी भाषण करण्यास उभे राहतात. अब दुनिया की कोई ताकद राममंदिर को रोक नही सकती ', अडथळे आणले तर केंद्रात सरकार चालू देणार नाही. '' जो शहीद होने आये है, उन्हे शहीद होने दो. रामचरण मे जाना अगर उनगे भाग मे होगा, तो उन्हे शहीद होने दो '' , भाषा आक्रमक. प्रक्षोभक. त्याच्या प्रत्येक वाक्याला कारसेवकांची दाद.

रा. स्व. संघाच्या आत्मघातकी पथकाने राम चबुत-यावर प्रवेश केलेला असतो. काही घुसखोरांना बाहेर काढले जाते. हाणामा-या नि बाचाबाची काही साधू आया-बहिणीवरून शिव्या घालतात. एक साधू 
व्हॉइस ऑफ अमेरिका च्या वार्ताहराला मारहाण करतात. टाइम मॅगझीनच्या वार्ताहरही यातून सुटत नाही. शिव्यांच्या लाखोलीत पाच-पंचवीस छायाचित्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेतले जातात. काही काँक्रीटवर आदळले जातात, तर काही पळवले जातात. आरडाओरडा, गोंधळ. सिंघल येतात. निघून जातात. या गोंधळात अडवाणी आपले कमांडर शोधू लागतात. मेरे कमांडर किधर है ', अशी चौकशी करतात. प्रचंड हादरलेले असतात. गडबड, गोंधळ सुरूच. प्रभू रामचंद्रांनी संयम पाळला म्हणूनच धनुष्य तोडला. हा ढाचाही तसाच तुटेल. कारण तोपर्यंत साधूसंत शांत होणार नाहीत... माईकवरून कुणाचं तरी भाषण सुरू असतं. गडबड वाढते.

११.५० वा. मशिदीवर पहिला दगड पडतो. पाठोपाठ चहूबाजूंनी दगडाचा वर्षाव. राज्य सरकारच्या सांगण्यावरून मशिदीत केंद्रीय राखीव पोलिसांची तुकडी तैनात असते. या दगडफेकीत हे ७-८ पोलिस घायाळ. तेवढ्यात काही घुसखोर कुंपणावरून मशिदीत घुसतात. घुमटावर चढतात. हजारो कारसेवक उन्मादाने नाचू लागतात. दगडफेकीला आणखीनच जोर चढतो. माईकवरून सूचना सुरू होतत. कोई भी पुलीस हस्तक्षेप करेगा नही. 
'' पुलीस को अनुरोध है के वो किसी भी हालत मे हस्तक्षेप ना करे'' . कारसेवकांवर दगड फेकू नका. कारण आपलेच कारसेवक जखमी होत आहेत.

पोलीस स्वस्थपणे पाहात आहेत. तेवढ्यात आणखी शेकडो कारसेवक कुंपणावरून आत शिरतात. सीआरपीचे डीआयजी ओ. पी. मलिक यांना दगड लागतो. कारसेवक मशिदीत घुसतात. गर्भगृहात जेथे रामाची मूर्ती ठेवली आहे, तेथे विनयकुमार पांडे नावाचा पुजा-याचा मुलगा बसलेला असतो. संतप्त कारसेवक त्याला मारहाण करून मूर्ती बाजूला ठेवतात. मूर्तीचे मुकूट आणि सोन्याचांदीचे दागिने पळवले जातात. घायाळ सीआरपी त्या मुलास घेऊन नियंत्रण कक्षात येतात.

मिळेल त्या हत्याराने, साधनाने घुमटांची खुदाई सुरू होते. शंखध्वनी, टाळ्या, घोषणा आणि तोडफोड. यात बाहेरची भिंत पडते. तसा टाळ्यांचा कडकडाट. मशिदीचा ताबा पूर्णपणे कारसेवक आणि साधूंकडे. सगळे पोलिस एका बाजुला होतात. जिल्हा दंडाधिकारी ज्येष्ठ पोलीस अधिकारी हे दृश्य जवळच्या नियंत्रण कक्षात बसून स्वस्थपणे पाहात असतात. जमावात आता ढोलकी, टाळ, ताशा वगैरे. लोक विजयी मुद्रेने मशिदीच्या विटा, सळ्या वाजतगाजत नेत असतात. एव्हाना १५-२० कारसेवक जखमी. ५० ते ६० पत्रकार-छायचित्रकारांना मारहाण. यातून बीबीसीचे मार्क टुलीही सुटत नाहीत. ६० ते ७० कॅमेरे लंपास. ध्वनिक्षेपकावरून पुन्हा सुटका.
'' सारे रोड ब्लॉक किये जाय. सीआरपी की एकी भी गाडी अंदर आ न सके '' २.४० वाजता घुमटाची एक भिंत कोसळते. २.५० वाजता घुमट जमीनदोस्त. माईकवर आता ऋतंभरा येतात. '' कलंक का ये ढाचा खत्म करो. राम नाम सत्य है. बाबरी मशीद तोड दे '' ऋतंभरा म्हणत, '' एक धक्का और दो '' . कारसेवक म्हणत, '' बाबरी मशीद तोड दो .'' 

४ वाजता आणखी एक घुमट जमीनदोस्त. त्यात अनेक कारसेवक जखमी. त्यांची जागा तिसरी तुकडी घेते. सर्वत्र जल्लोष आणि घोषणा. जिल्हा दंडाधिकारी आणि इतर नुस्ते पाहतात. बरोबर ४.४६ मिनिटांनी मधला घुमट खाली येतो. लाखो कारसेवक आनंदाने नाचत असतात. 
'' कलंक का ढाचा खत्म हुआ '' , राज्याचे पोलीस एकमेकांना टाळ्या देत असतात. साध्वी ऋतंभरा जोराजोरात अभिनंदन करीत असतात. कारसेवकांच्या रांगा रेल्वे स्टेशनकडे. प्रत्येक जण बरोबर जाताना मशिदीच्या दगड-विटांसह दिसतो. वार्ताहर-छायाचित्रकार पोलिसांच्या ट्रकमधून कसेबसे फैजाबादेत. तेथे कर्फ्यू. तेथले लोक म्हणतात- आखिर बीजेपीने ढाचा खत्म तो किया. सर्वत्र बीजेपीचे कौतुक. कर्फ्यूतही रस्त्यावर वर्दळ. चर्चा. एव्हाना अडवाणी-जोशी कधीच गायब झालेले असतात.





७ डिसेंबर १९९२
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर अनेक शहरांत संचारबदी. फैजाबादेत सहा डिसेंबरच्या रात्री काही ठिकाणी जाळपोळ. रस्त्यावर शुकशुकाट. कारसेवक जथ्थ्या जथ्थ्याने निघालेले. परतीच्या वाटेत घोषणा ऐकायला मिळत नाहीत. जो तो शांतपणे निघालेला. संचारबंदी असली तरी फारशी कठोर नाही. त्यामुळे घराच्या दाराबाहेर पेपर वाचत चर्चा चाललेली मिळते.


कल्याणसिंगने सही वक्त पर इस्तिफा दे दिया. अब तो नरसिंहा राव को भी जाना पडेगा. अच्छा हुवा बरसोंका कलंक मिट गया. बीच्जेपी तो अब सेंटरमे जायेगा. कोई उसे रोक नही पायेगा... एकंदर लोक भाजपवर एकदम खूष. व्ही. पी. सिंग आणि नरसिंह राव या दोघांनाही शिव्याशाप. राज्याचे पोलिसही वर्तमानपत्र वाताना चर्चा करताना दिसतात. सूर एकच. बीजेपीने बडा अच्छा काम किया. सर्वत्र टीका होत असताना जनमत भाजपबरोबर.

अयोध्येच्या वाटेवर जाताना फैजाबादेत झालेली जाळपोळ दिसते. फैजाबादची हद्द संपातच अयोध्येची हद्द सुरू होते. कारसेवक मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकाकडे निघालेले असतात. प्रत्येकाच्या हातात कारसेवेची खूणगाठ म्हणून वीट, सळई इत्यादी वस्तू. बाबरी मशीद पाडल्यानंतर मिळलेल्या चीजा. मधूनमधून सीयारामच्या घोषणा.

अयोध्येत शिरताच ठिकठिकाणी धुराचे लोट आकाशाकडे झेपावताना दिसतात. घरांना, दुकानांना आगी लावण्याचा कार्यक्रम जोरात सुरू असतो. हा कार्यक्रम रात्रीपासून असल्याने एव्हाना ६०-७० घरे भस्मसात झालेली असतात. कारसेवक उत्साहाने उरलेली कारसेवा करताना दिसत असतात. स्थानिक लोक घरं दाखवतात आणि कारसेवक आगी लावतात, असे चित्र. स्थानिक पोलीस कोंडाळी करून प्रत्येक घटना कुतुहलाने पाहताना दिसतात. घर अथवा दुकान फुटले की लोक आत घुसून लूटमार करतात. यात स्थानिक पोलिसही हाताला लागेल ते घेऊन बाजूला होतात. कारसेवक चुकून एका हिंदूच्या बंद घरावर हल्ला करतात. लोक सांगतात, 'इधर नहीं भाइं उधर'. मोर्चा तिकडे वळतो. असे प्रकार अयोध्येत ठिकठिकाणी चालू असतात.

स्थानिक अधिका-यांना विचारलं असता ते म्हणतात, हम क्या करें, हमें काई आदेश नहीं. डीएम फैजाबाद जा बैठे है. बाबरी मशिदीजवळ जोरात कारसेवा चाललेली असते. एव्हाना मशीद पूर्णपणे साफ झालेली असते. बायका पुरुष उत्साहाने माती, दगड, वीटा दूरवर टाकताना दिसतात. विश्व हिंदू परिषदेच्या र्माकवरून सूचना चालेल्या असतात. ज्यांना काल कारसेवेत भाग घेता आला नाही, त्यंनी आज कारसेवा करुनच निघावे. पविग कार्यात मागे राहू नका. इ. इ.

इतक्यात आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागेत. उद्ध्वस्त बाबरी मशिदीजवळ पाच-पन्नास हजारांचा जमाव 'जय सीयाराम'च्या घोषणा देतो. हेलिकॉप्टर बीएसएफ अथवा लष्कराचे असावे. अयोध्येची हवाई पाहणी चालू असते. बाबरी मशीद चली गयी, अब नरसिंह राव चला जायेगा,' जोरदार घोषणा. उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी अयोध्येत कारसेवकांचेच राज्य सुरू असते.

मशिदीची जागा साफ करुन तिथे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम चालू असतो. तात्पुरती जागा सारवून त्यावर मूर्ती ठेवल्या जात असतात. राम मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्याशिवाय डीएम म्हणजे जिल्हा दंडाधिकारी सीआरपींना बोलावणार नाहीत, अशी जोरदार चर्चा. तिकडे रामकथा कुंजच्या गच्चीवरुन भाषणं चालू असतात. हजारोंच्या संख्येने कारसेवक ती भाषणं ऐकत असतात. अब महाराष्ट्र के भूतपूर्व विरोधी पक्ष नेता मनोहर जोशी साहब भाषण करेंगे... जोशी मोठ्या जोशात बोलत असतात. सहा डिसेंबर हा हिंदूच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन म्हणून नोंद होईल. इ. इ.

फैजाबादकडे जाणा-या रस्त्यावर ठिकठिकाणी वखारी पेटलेल्या असतात. उरल्यासुरल्या मशिदी फोडण्याचे काम सुरू असते. धुराचे लोळ आकाशाकडे झेपावत असतात. विहिंपच्या नेत्यांच्या मोटारीचा ताफा निघालेला असतो... पुढे एस्कॉर्ट मागे एस्कॅर्ट... आचार्य गिरीराज किशोर एका मोटारीतून आग पहात जात असतात... जय सीयारामच्या घोषणेने त्यांना निरोप देण्यात येत असतो.

थोड्या वेळाने शिवसेना नेत्यांच्या मोटारी निघतात. मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ता नलावडे, लीलाधर डाके, आनंद दिघे फैजाबादकडे मार्गस्थ होतात... जाळपोळ आणि लुटालूट चालूच असते... पोलीस मजा पाहत असतात आणि हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत असते... अजूनही केंद्र सरकार आकाशातच असते.



८ डिसेंबर १९९२ 
अयोध्येत ८ डिसेंबरला पहाटे साडेतीन-चारचा सुमार. बाबरी मशिदीच्या जागेवर चोहोबाजूने पाच फुटी भिंत. आत चौथरा, चौथ-यावर राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती विराजामान झालेल्या असतात. पाच पन्नास उत्साही कारसेवक परिसरात गप्पा मारत बसलेले असतात काळोख आणि थंडी. केंदीय राखीव पोलिसांचा रॅपिड अॅक्शन फोर्स काळोखात सावधपणे निघालेला. बाबरी मशीद एका टेकाडावर होती. मागच्या बाजूला मोठा खोलवर भाग.

अयोध्येतील वादग्रस्त जागेचा ताबा घेण्याचा आदेश जारी झालेला असतो. चोहोबाजूने जवान सावकाशपणे अंदाज घेत पुढे निघालेले असतात. हळूहळू टेकाड चढून एक-एक जण वर येतो. ज्या जागेवर मूर्ती ठेवल्या आहेत. तिला वेढा पडतो. इतक्यात कारसेवकांना खबर लागते. शंभर-दोनशे तरुण सामोरे जातात. आरडाओरडा आणि गलका. सगळे खडबडून जागे होतात.

जवान काठ्या-लाठ्या आपटत चालून जातात. त्यामुळे एकच घबराट. जे कारसेवक सामना करायला जातात त्यांच्यावर सौम्यपणे छडीमार. जो तो धावत सुटतो. एव्हाना सगळे जागे होऊन परिसराकडे निगालेले असतात. 'राम कथा कुंज'चा माइक सुरू होतो. 'अयोध्यावासी चले आव सीआरपीने हमला बोल किया हे' रामद्रोही आये हे... अयोध्यावासी चले आव...'

हनुमानगढी आणि मानसभवनमधून दगडफेक सुरू होते. रॅपिड अॅक्शन फोर्सची त्वरेने कारवाई... अश्रुधूराची पाच नळकांडी फुटतात. दुस-या बाजूने थंडगार पाण्याचा मारा. जो तो मिळेल त्या वाटेने. जीवन मुठीत घेऊन... कोण म्हणते फैरिंग हो रही है... मग आणखीनच धावाधाव... अवघ्या पंधरा मिनिटात सगळा परिसर रिकामा.

रॅपिड अॅक्शन फोर्सची कारवाई फत्ते झालेली असते. सगळा विवाद्य परिसर ते ताब्यात घेतता. कारसेवक फैजाबादच्या रस्त्यावर जमलेले असतात. तिथेही चोहोबाजूने केंद्रीय राखीव पोलिस... कारसेवा रोखी गयी है. आप अपने अपने सीआरपीच्या गराड्यात राममूर्ती सुरक्षित. पूजेसाठी फक्त पुजा-याच्या अपवाद.

अयोध्या रेल्वे स्थानकावर परतण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या लागल्या असतात. काल रात्रीपासून १८ गाड्या भरभरून कारसेवक गेले. थांबण्याचा आदेश असतानाही. रात्रीच पंतप्रधान नरसिंह राव यांचा निरोप आला होता, असे विहिंपवाले सांगतात. शांतपणे परिसर मोकळा करा, केन्दीय राखीव पोलिस मारहाण करणार नाही. झाले तसेच किरकोळ दगडफेक आणि परचुटन लाठीमार. मामला संपला.

सकाळपर्यंत राखीव पोलिसांनी संबंध अयोध्येत झडत्या घेतल्या. जे बाहेरगावचे होते त्या सर्वांना बाहेर काढून वाटेला लावले. नऊ वाजेपर्यंत सगळ्या अयोध्येवर नियंत्रण. दुपारी १२ वाजेपर्यंत संबंध वादग्रस्त विभागाभोवती तारेचं जबर कुंपण उभारले होते. कुंपणाबरोबरच जागोजाग सशस्त्र जवान.

उत्तर प्रदेशचे पोलिस कारसेवकांबरोबच दूर लोटलेले असतात. अयोध्येतील कारसेवकांच्या सर्व राहुट्या रिकाम्या झालेल्या असतात. दुपारी बाराच्या सुमारास महाराष्ट्रातील व खासकरून मुंबईचा जथ्या निघालेला असतो... हा जथ्या शेवटाच असल्यामुळे अयोध्येत आता एकही कारसेवक उरलेला नसतो. सरचिटणीस अशोक सिंघल सकाळी पाऊणे दहाच्या सुमारास अयोध्या सोडून गेलेले असतात...

गेले पंधरा दिवस गजबजलेली अयोध्या जवळजवळ निर्जीव. आठ दिवसरात्र चाललेले भटारखाने थंड झालेले. भटारखान्याबाहेर कांदे-बटाटे आणि वाग्यांचे ढीग तसेच पडलेले... गेले पंधरा दिवस अहोरात्र घसा कोरडा करणारा विहिंपचा ध्वनिक्षेकही आता शांत झालेला असतो... त्यामुळे एकदम शांतता. अयोध्येत आता फक्त सीआरपी आणि रॅपिट अॅक्शन फोर्सच्या मोटारींचा आवाज आणि जागोजाग कारसेवकांनी केलल्या जाळपोळीच्या खुणा व उद्ध्वस्त झालेली मुसलमानांची घरे. बाकी सर्व संपले. तूर्तास!



ही आहे कहाणी अयोध्याची ............
लेख प्रताप आसबे यांनी लिहिले असून मी फ़क्त माज्या ब्लॉग वर पोस्ट करतोय............

No comments: