Pages

Friday, October 8, 2010

Navaratri

नवरात्राची आरती




आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसलि सिंहासनीं हो । 
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो ॥ 
मूलमंत्रजप करुनी भोंवते रक्षक ठेउनी हो । 
ब्रह्माविष्णुरुद्र आईचें पूजन करिती हो ॥ १ ॥ 


उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । 
उदोकारें गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ॥ ध्रु० ॥ 


द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो । 
सकळांमध्यें श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ॥ 
कस्तुरीमळवट भांगी शेंदूर भरुनी हो 
उदोकारें गर्जती सकल चामुंडा मिळुनी हो ॥ उदो० ॥ २ ॥


 तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो । 
मळवट पातळ चोळी कंठीं हार मुक्ताफळां हो ॥ 
कंठींचीं पदकें कांसे पीतांबर पिवळा हो । 
अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ॥ उदो० ॥ ३ ॥ 


चतुर्थीचे दिवशीं विश्वव्यापक जननी हो 
उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ॥ 
पूर्णकृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । 
भक्तांच्या माउली सुर ते येती लोटांगणीं हो ॥ उदो० ॥ ४ ॥ 


पंचमीचे दिवशीं व्रत तें उपांगललिता हो  
अर्थ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो 
 रात्रीचे समयीं करिती जागरण हरिकथा हो 
 आनंदें प्रेम तेंआलें सद्भावें क्रीडतां हो ॥ उदो० ॥ ५ ॥ 


षष्ठीचे दिवशीं भक्तां आनंद वर्तला हो ।  
घेउनि दिवट्या हस्तीं हर्षें गोंधळ घातला हो  
कवडी एक अर्पितां देसी हार मुक्ताफळां हो ।
जोगवा मागतां प्रसन्न झाली भक्तकुळा हो ॥ उदो० ॥ ६ ॥ 


सप्तमीचे दिवशीं सप्तश्रृंगगडावरी हो । 
तेथें तूं नांदसी भोंवतीं पुष्पें नानापरी हो ॥ 
जाईजुईशेवंती पूजा रेखियली बरवी हो । 
भक्त संकटींपडतां झेलुनि घेसी वरचेवरी हो ॥ उदो० ॥७ ॥ 


अष्टमीचे दिवशीं अष्टभुजा नारायनी हो । 
सह्याद्रीपर्वतीं पाहिली उभी जगज्जननी हो ॥ 
मन माझें मोहिलें शरण आलों तुजलागुनी हो ।
स्तनपान देउनि सुखी केलें अंतःकरणीं हो ॥ उदो० ॥ ८ ॥ 


नवमीचे दिवशीं नवदिवसांचें पारणें हो । 
सप्तशतीजप होमहवनें सद्भक्ती करुनी हो ॥ 
षड्रस‍अन्नें नैवेद्यासी अर्पियली भोजनीं हो । 
आचार्यब्राह्मणां तृप्त केलें कृपेंकरुनी हो ॥ उदो० ॥ ९ ॥ 


दशमीच्या दिवशीं अंबा निघे सीमोल्लंघनीं हो । 
सिंहारूढे दारुण शस्त्रें अंबे त्वां घेउनी हो ॥ 
शुंभनिशुंभादिक राक्षसां किती मारिसी रणीं हो । 
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणीं हो ॥ उदो० ॥ १० ॥
.

देवीची आरती




दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांतें वारी
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करता पडले प्रवाही
ते तू भक्तांलागी पावसि लवलाही॥२॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
प्रसन्नवदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशापासुन सोडी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा॥३॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥


No comments: