Pages

Monday, October 18, 2010

भाग आठ - 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)

भाग आठ - 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)


ग्रुपमध्ये आता साडेतीन कपल्स होते. मिथिला-नचिकेत, आशय-ऋतूजा, प्रिन्सेस आणि कुणीतरी ज्युनिअर (तात्पुरता), तर पप्प्या अजून काहीसा तळ्यात-मळ्यात होता. कॉलेजचे सोनेरी दिवस सरत आले. फेअवरव्हेलचा पाहुणचारही हादडून झाला. कॉलेजची आणि नंतर विद्यापीठाची खडतर परीक्षा आटोपली. पेपर चांगले गेले. गेले म्हणजे नाक दाबून गळ्यात कडवट औषध ढकलल्याप्रमाणे गेले. म्हणून रिझल्टची धाकधूक लागली होती. शेवटी चांगले गुण पडले. कंपनीतील प्रवेशाची चाहूल लागली. एक नव्या जगात प्रवेश झाला. बघुया काय झाले ते... 

कॉलेजचा फेअरव्हेल दणकून झाला. ग्रुपमधले दोन सदस्य - जे अगदी भावनात्मकरीत्या कोरडे होते - ते प्रेमात पडले. पडले म्हणा किंवा धडपडले. दोन्ही सारखेच. प्रिन्सेस एका ज्युनिअरच्या गळ्यात अडकली, तर नुकत्याच नोकरीवर लागलेल्या एका लेक्‍चररने पप्प्याची दांडी गुल केली होती. तसे बघितले, तर दोघांची प्रकरणे अगदी जगावेगळी. ती फार काळ टिकेल, असे वाटत नव्हते. प्रिन्सेसचा तसाही बॉयफ्रेन्ड बदलण्यात रेकॉर्ड होता. आणि मित्रांची तर गणतीच नव्हती. पप्प्या तेवढा प्रामाणिक होता. तो कधी कुण्या मुलीशी बोलणार नाही. कधी कुणाशी मैत्री करणार नाही. मुलींना बघायला मात्र त्याला आवडायचे. तेवढाच काय तो नाद! तोही लेक्‍चररच्या प्रेमात पुरता अडकला. पण लेक्‍चररने अजून हिरवा सिग्नल फडकावला नसल्याने पप्प्याचे स्टेट्‌स काहीसे "वर्क इन प्रोग्रेस' असेच होते. ते आणखी कित्येक दिवस तसेच राहील, यावर ग्रुपचा दृढविश्‍वास होता. कारण पप्प्यात एखादी मुलगी पटविण्याची क्षमताच नव्हती. ग्रुपमधील इतरांनी त्याला ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्याच अंगलट यायला लागला. त्यानंतर त्याला कुणी काही सांगण्याची जोखीम पत्करली नाही. उलट त्याचे जे काही सुरू आहे, त्याचे खोटे खोटे कौतुक करून आपली सुटका करून घेण्यात तरबेज झाले.

दिवसांमागून दिवस जात होते. कॉलेजच्या परीक्षा सुरू झाल्या. त्याला केवळ "उपस्थिती' अनिवार्य होती. युनिव्हर्सिटी परीक्षेच्या सरावासाठी त्या महत्त्वाच्या ठरल्या. केलेल्या अभ्यासाची उजळणी झाली. आणि पडताळणीही. त्यानंतर युनिव्हर्सिटी परीक्षा सुरू झाल्या. अभ्यासाचे अगदी काटेकोर नियोजन करावे लागले. अभ्यासूवृत्तीचा कस लागला. जीवनातले दोन आठवडे कसे गेले ते समजले नाही. सगळ्यांची अगदी "दयनीय अवस्था' झाली होती. मुलांची जीम सुटली, तर मुलींच्या पार्लरच्या फेऱ्या कमी झाल्या. पार्लरच्या फेऱ्या थांबतील, असे वाटले होते. पण स्त्री-स्वभावावर औषध नाही! एकदाची परीक्षा आटोपली. मनावरचे मणामणाचे ओझे उतरले. आयुष्यात पुन्हा उत्साह संचारला. रुटीनची पुरती वाट लागली. जीम आणि पार्लर तेवढे नित्यनियमाने सुरू झाले. आता निकालाची प्रतीक्षा होती. पण त्याची चिंता होती कुणाला. परीक्षा संपल्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होता. निकालाची वेळ येईल, तेव्हा बघूया काय होतंय ते, असा दृष्टिकोन त्यांनी जोपासला होता.

पण एक दिवस निकालाची तारीख जाहीर झाली. आनंदाने काठोकाठ भरलेल्या दिवसांवर रॉकेल पडलं. निकालाचा दिवस जसा जसा जवळ येत गेला, तसा तसा पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सेंटीमीटर सेंटिमीटरने वाढत होत्या. मनावर कसंलसं दडपण घेऊन सगळे वावरत होते. शब्दा शब्दात निकालाचा उल्लेख वाढत गेला. निकालाच्या आदल्या दिवशी विश्‍वास पुरता डळमळीत झाला. आपले पेपर चांगले गेलेच नव्हते, असा साक्षात्कार व्हायला लागला. भयावह स्वप्नांची मांदियाळी झाली. कमी टक्केवारीची मार्कशीट डोळ्यांसमोर झळकायला लागली. पप्प्याला तर निकालावर "फेल' हे अक्षर आदल्या दिवशीच सकाळी सकाळी स्वप्नात दिसले. त्यामुळे तो बिचारा पुरता घाबरलेला होता. बावरलेला होता. त्याला इतर धीर देत होते. जे आधीच निकालाच्या दडपणात आकंठ बुडाले होते.

शेवटी निकालाचा दिवस उजाडला. हा दिवस पराकोटीचं दडपण घेऊन आला. घरातील इतर सदस्यांसाठी तो दिवस सर्वसाधारण दिवसांप्रमाणेच असला, तरी त्यांच्यासाठी एक "कत्लकी रात' जाऊन "कत्लका दिन' सुरू झाला होता. कशातच लक्ष लागत नव्हते. काय करावे, तेही समजत नव्हते. घड्याळाचा काटा पुढे सरकत गेला. दुपार झाली. निकालाची घोषणा झाली. तसे सगळे चुरगळलेल्या कपड्यांनी, चेहऱ्यावर वितभर लांबीच्या सुरकुत्या मिरवत आणि मनावर भलेमोठे दडपण नाचवत निकालाला सामोरे गेले. निकाल बघितल्यावर गोऱ्या गालांवर सुरकुत्यांच्या जागी गुलाबी छटा उमटल्या. आश्‍चर्याने ओठ वाकडे झाले. त्यानंतर पर्सच्या छोटाशा आरशात बघून "शॉर्ट बट स्वीट' मेकअप चढविण्यात आला. मुलांनी उजव्या हाताच्या मुळी वळल्या. जोरजोरात शिट्या शिलगावल्या. सर्वत्र आनंद पसरला. आपण उगाच जुने कपडे चढवून निकाल बघायला आलो, असेही काहींच्या मनात येऊन गेले.

निकाल बघितल्यावर त्यांचा ग्रुप कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जमला. कदाचित कॅन्टीनमध्ये एकत्र येण्याची ही अंतिम वेळ असावी. ती तेव्हा कुणाच्याच किंचितही लक्षात आली नाही. चायनीज आणि कडवट कॉफीची ऑर्डर सोडण्यात आली.

""काही म्हणा यार, चांगले मार्कस मिळाल्याने जिवात जीव आला. अगदी हायसे वाटले. आपले पेपर कसले कठीण गेले होते. सगळ्यांचा पोटात भीतीचा गोळा उठला होता. वाटत होते, आता चांगले मार्कस पण मिळणार नाही. आणि हाती आलेली नोकरीही. सगळे हातून निसटून गेले आहे. पण खरंच छान मार्कस पडले. मी अपेक्षाही केली नव्हती. ज्याने कुणी माझा पेपर तपासला असेल, त्याला सॅलरी हाईक मिळो-बढती मिळो, अशी देवाचरणी प्रार्थना,'' आशय उत्साहात बोलत होता. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

""चांगले मार्कस मिळाले, तर याला आज देव आठवला. आहे की नाही कलंदर! कॉलेज सुरू असताना कधी गेला होता का मंदिरात? आज सकाळी कधी नव्हे ते मंदिरात जाऊन आला आणि आता दिवसभर मारे देव देव करतोय. असो! पण खरंच ज्याने कुणी पेपर तपासला असेल, त्याला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. एखादा चांगल्या स्वभावाचा माणूस असेल तो. त्याने अगदी सढळ हाताने मार्कस दिलेत,'' मिथिलाने आशयला उडवून लावला.

""अरे मी मगापासून बघतोय, तुम्ही पेपर तपासणाऱ्याची यथेच्छ स्तुती करताय. आपल्या सर्वांचे पेपर एकाच व्यक्तीने तपासले असतील काय? तुम्ही पण ना राव, ग्रेटच आहात. डोक्‍याचा थोडा तरी वापर करा. आता काही दिवसांनी तुम्ही कार्पोरेट जगात वावरणार आहात. आणि हे असले विचार. कुणी काही म्हणेल, याची जराही चिंता नाही,'' नचिकेत उगाच समजूतदारपणाचा आव आणत होता. पण येथे त्याचाही बाप बसला होता.

""एक नाही तर हजार माणसं असतील, पेपर चेक करणारे. त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा. त्याच्याशी आपला काय संबंध. आपण आपल्यापरीनं त्यांचे आभार मानले तेवढंच समाधान... मला तर बाबा आता मी कधी एकदाचा कंपनीत दाखल होतो आणि कधी नाही असं झालंय. मी कंपनीचं ऑफिस पाहिलंय. कसलं चकाचक आहे ते. अगदी अमेरिकेत गेल्यासारखं वाटत होतं. आणि कसल्या त्या चिकण्या...,'' पप्प्याने दीडशेच्या स्पिडने पळणाऱ्या जिभेला करकचून हॅन्डब्रेक लावला. तरीही इतरांना जे समाजायचं ते समजलं. पप्प्याच्या स्वभावाचा सर्वांना सराव झाला होता.

अविट विषयांवर चर्चेचे मोहोळ उठले. प्रत्येकजण आनंदात असल्याने उत्साहाने सहभागी होत होता. येत्या आठवड्यात ऑफर लेटर घेऊन त्यांना कंपनीत दाखल व्हायचे होते. कायमचे कॉलेज लाइफ संपविण्यासाठी. एका नवीन जगात प्रवेश करण्यासाठी.
(क्रमशः)





- विजय लाड

No comments: