Pages

Friday, October 15, 2010

पुन्हा मिळतील का ते दिवस?

पुन्हा मिळतील का ते दिवस?

ती सतरा वर्षे. कदाचित जीवनातील सर्वात अविस्मरणीय वर्षे... वडिलांचे
रागावून पाहणे... मग कुठल्यातरी गोष्टीसाठी आईकडून त्यांच्याकडे शिफारस
करणे, लहानसहान गोष्टींवर रागावून न जेवणं... शाळेतली आवडलेली पहिली
मुलगी, ते गुपित माहित असणारे शाळेतले मित्र... रोज अभ्यासाचे वेळापत्रक
बनवणे आणि ते मोडणं... अगदी मित्रांना शपथ घेऊन वचन देणे, मग ती दिलेली
वचने विसरुन जाणे... परीक्षेच्या आधी रात्रभर केलेली
जागरणं... शेजारच्या उत्तरपत्रिकेत डोकावणं... वर्गात नेहमी तिच्याकडेच
पाहत राहणं... शिक्षकांना नावं ठेवणं... हेडसरांनाही न घाबरणं...
छोट्याछोट्या गोष्टींवरुन ’अ’ तुकडीतल्या पोरांशी पंगा घेणं, ’ड’
तुकडीतल्या पोरांकडं तुच्छतेने पाहणं... पीटीच्या खडूस मास्तरला घाबरणं...शेजारच्या काकूंच्या घरी जाऊन बिनधास्त चरणं, मग घरी येऊन आईची बोलणी
खाणं. सहलीसाठी पैसे भरायचे म्हणून स्वतःच घरी येऊन बाईंनी पाठवलं म्हणून
खोटंच सांगणं, घरी जाताना एक डबडं लाथेने उडवत उडवत घरापर्यंत घेऊन जाणं,
मित्रांशी खिसाबुक्की आणि स्टॅच्यू खेळणं... कधीतरी वडिलांच्या ऑफिसमध्ये
जाऊन दुसर्‍या दिवशी उगाच मित्रांच्यात भाव खाणं...यल करुन लावण्यापेक्षा पुशबटनचा फोन असलेल्या लांबवरच्या एसटीडी बूथवर
जाणं, दहावीचा निकाल लागल्यावर बक्षीस मिळालेली पहिली शंभराची नोट,
अकरावीला कॉलेजला गेल्यावर इमारतीकडे वर पाहत पाहत एका टग्या पोराला
धडकणं, पहिल्यांदाच लेक्चर बंक मारणं, पहिला घरी न सांगता पाहिलेला
पिच्चर, कॉलेजजवळच्या स्वीटहोममध्ये जाऊन सामोसे खाऊन सेलिब्रेट केलेला
बर्थडे, डिसेक्शन बॉक्समधल्या चाकूने कापलेला केक... बुटाला लागलेली धूळ
एक पाय वर घेऊन पोटरीवर पॅंटला पुसणं, घातलेली पहिलीच जीन्स आणि शूज...
उसन्या आणलेल्या कॅमेरासमोर उगाच एक पाय पुढे करुन ऐटीत दिलेली पोज, मग
कित्येक दिवस तोच फोटो निरखून बघणं, ओठ ओले करुन मिशी दिसतेय का ते आरशात
पाहणं, लॅमिनेट केलेल्या आयकार्डवर फोटोला स्केचपेनाने मिशी काढून पाहणं...सगळं कसं अगदी काल झाल्यासारखं आठवतंय... पुन्हा मिळतील का ते दिवस?

No comments: